MMLBY
MMLBY : मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना. महिला व बालविकास मंत्रालय, महाराष्ट्र राज्य. अंतर्गत आयुक्त, महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य, पुणे "नियंत्रण अधिकारी" व आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई "सह-नियंत्रण अधिकारी" असतील.
महाराष्ट्र राज्यातील महिलांची आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य, पोषणामध्ये सुधारणा, राहणीमान उंचावणे तसेच कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने दिनांक : २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली.
मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रुपये १५००/- असा आर्थिक लाभ थेट लाभ हस्तांतरण DBT (Direct Benefit Transfer) द्वारे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे.
शासन निर्णय :- सदर शासन निर्णय दिनांक : २८ जून २०२४ रोजीच्या मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा सांकेतांक २०२४०६२८१८१४०१८२३० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षाकिंत करुन काढण्यात आला आहे.
पात्रता :- मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना पात्रता निकष ठरविण्यात आले असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना खालीलप्रमाणे पात्रता निकष पूर्ण करणे बंधनकारक आहे.
१. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
२. महाराष्ट्र राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार तसेच कुटूंबातील एक अविवाहित महिला.
३. किमान वय २१ वर्षे व कमाल वय ६५ वर्षे होईपर्यंत. २१ वर्ष ते ६५ वर्ष वयोगटातील (विवाहित व अविवाहित) महिला.
४. 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना' या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलांकडे आधार लिंक बँक खाते असणे आवश्यक आहे.
५. लाभार्थी महिला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
अपात्रता :- 'MMLBY' अपात्र निकष ठरविण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केले जात आहेत. मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना अपात्र अटी खालीलप्रमाणे.
१. महाराष्ट्रातील ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
२. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे. त्या कुटुंबातील महिला अपात्र असेल.
३. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत.
४. बाह्ययंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
५. लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये १५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
६. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे.
७. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड किंवा कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा संचालक किंवा सदस्य आहेत.
८. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त शेतजमीन आहेत.
९. ज्या महिलांच्या नावावर किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहेत. असे कुटूंब किंवा महिला अपात्र ठरणार आहे.
कागदपत्रे :- मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळविण्याकरिता लाभार्थी महिलांनी खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत.
१. ऑनलाईन अर्ज
२. आधार कार्ड
३. अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
४. उत्पन्न दाखला किंवा शिधापत्रिका
५. बँक खाते पुस्तक (ऐच्छिक)
६. हमीपत्र
७. पासपोर्ट फोटो
टीप :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सादर करताना घ्यावयाची काळजी.
१. लाभार्थी महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल व विवाह महाराष्ट्रात झाला असेल आणि वास्तव्य १५ वर्षांपेक्षा जास्त असेल तर पतीचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला जोडणे.
२. वयाचा पुरावा म्हणून महाराष्ट्रातील महिलांनी अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला यांपैकी एक जोडणे.
३. लाभार्थी महिलेकडे रेशन कार्ड नसेल तर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटूंब प्रमुखांचा उत्पन्न दाखला रुपये २.५० लाखापर्यंत अनिवार्य.
४. बँक खाते पुस्तकाचे पहिल्या पानाचे छायांकित प्रत जोडणे ऐच्छिक आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थेट लाभ हस्तांतरण DBT असल्याने बँक खाते पुस्तकाची आवश्यकता नाही. म्हणजेच, आधार कार्ड ची लिंक असलेल्या बँक खात्यात पैसे जमा होतील.
अर्ज करण्याची प्रक्रिया :- 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना' अंतर्गत महिलांना लाभ घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्ज करण्याची पद्धती खालीलप्रमाणे.
१. संकेतस्थळ किंवा नारीशक्तीदूत मोबाईल ऍप किंवा सेतू सुविधा केंद्रात अर्ज भरले जातील.
२. महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल तर, अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा मुख्यसेविका किंवा सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामसेवक किंवा वार्ड अधिकारी किंवा आपले सरकार सेवा केंद्रात ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.
३. ऑफलाईन पद्धतीने जमा केलेले अर्ज अंगणवाडी केंद्र किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी/ ग्रामीण/आदिवासी) किंवा ग्रामपंचायत किंवा वार्ड किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन अर्ज प्रविष्ट केला जाईल. MMLBY
